शिर्डी - साईबाबा नगरीत राहता तालुका कुस्ती तालीम संघाच्या वतीने २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरियाणाच्या दोन महिला कुस्तीपटूंनी सुवर्णपदक मिळवले आहे. ७२ किलो वजनी गटात नैनाने तर, ७६ किलो वजनी गटात पूजाने सुवर्णपदक पटकावले आहे.
हेही वाचा - हॉकी : भारताकडून स्पेनचा धुव्वा, केली ६-१ ने मात
या स्पर्धेतील विजेत्या कुस्तीपटूंना हंगेरी येथे होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत हंगेरी येथे होणाऱ्या अंडर-२३ विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत नैना आणि पूजा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
हरियाणाने या स्पर्धेत एकूण ९ पदके पटकावली आहेत. त्यामध्ये सहा सुवर्ण आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. ७२ किलो वजनी गटात नैनाने दिल्लीच्या रीनाला ६-० ने हरवले. तर, ७६ किलो वजनी गटात पूजाने पंजाबच्या नवज्योतला ११-० ने मात दिली.
या स्पर्धेत देशभरातल्या २६ राज्यातील २८ कुस्ती संघानी भाग घेतला आहे. या कुस्ती संघातील ८२० मल्लांपैकी २५० खेळाडू या महिला कुस्तीपटू आहेत. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष व उत्तरप्रदेशचे खासदार ब्रिजभूषण चरणसिंग आणि राज्य कुस्तीवीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे हे या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध किलो वजनाच्या १० गटातुन मॅटवरच्या कुस्तीची ही स्पर्धा तीन दिवस रंगणार आहे.