पनामा सिटी - कोरोनाव्हायरसवर उपचार घेतल्यानंतर दिग्गज माजी बॉक्सर रॉबर्ट दुरान यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर दुरान यांना 25 जून रोजी पनामा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
"देवाच्या कृपेने कोरोनासोबतच्या लढाईनंतर मी घरी परतलो. ही विश्वविजेतेपदाची लढत होती. तुमचे समर्थन, प्रेम आणि वैद्यकीय संघाच्या वचनबद्धतेमुळे मी ही लढाई जिंकू शकलो. वैद्यकीय पथकाने माझ्यासह सर्व रुग्णांची काळजी घेतली. प्रसिद्धी, पदवी, पुरस्कार, जात आणि धर्माबद्दल माहित नसलेल्या या रूग्णांनीही माझ्यासारखीच झुंज दिली", असे दुरान यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले.
ते पुढे म्हणाले, "लढा सुरूच ठेवलेल्या सर्व लोकांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मी प्रार्थना करतो, जेणेकरून त्यांना हे समजेल की ते देवाच्या नियंत्रणाखाली आहेत. मी जगातील सर्व चाहत्यांचे आभार मानतो. त्या डॉक्टरांना, परिचारिकांचे आभार मानण्यास मी कधीही थकणार नाही. मी एक माजी विश्वविजेता आहे. मात्र, हे सर्व खरे चॅम्पियन्स आहेत."
16 ते 50 वयोगटात दुरान यांनी एकूण 119 सामने खेळले. त्यात त्यांनी 103 सामन्यात विजय नोंदवला आहे.