दोहा : 2010 फुटबॉल विश्वचषकातील सर्वात वादग्रस्त सामन्यानंतर, घाना आणि उरुग्वे हे संघ त्यांच्या शेवटच्या गट एच सामन्यात आज पुन्हा आमनेसामने आहेत. दरम्यान, घानाचे प्रशिक्षक ओट्टो एडो म्हणाले, झालेली घटना खूप पूर्वीची होती. (ghana vs uruguay) (south korea vs portugal)
12 वर्षांपूर्वी झाला होता मोठा वाद : 2010 च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेविरुद्ध झालेल्या पराभवाची वेदना घानावासीयांच्या मनात अजूनही ताजी आहे. अतिरिक्त वेळेच्या शेवटी, उरुग्वेचा स्ट्रायकर लुईस सुआरेझने जाणीवपूर्वक चेंडू हाताने अडवून घानाचा गोल रोखला. रेफरीने सुआरेझला हँडबॉलसाठी रेड कार्ड दाखवून सामन्याबाहेर केले आणि घानाला पेनल्टी मिळाली. मात्र पेनल्टी किकवरून असामोह ग्यानचा फटका क्रॉसबारवर आदळून गोल हुकला. गोल मिस झाल्यानंतर सुआरेझ संघाच्या बॉक्समध्ये आनंद साजरा करताना दिसला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये उरुग्वेने विजय मिळवला. जर या सामन्यात घाना जिंकला असता तर तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला आफ्रिकन संघ बनला असता. बारा वर्षांनंतर, घानाला आता त्यांच्या शेवटच्या गट एच सामन्यात उरुग्वेचा पराभव करून त्या सामन्याचा बदला घेण्याची संधी आहे. या विजयासह घाना अंतिम 16 मध्ये प्रवेश करेल तर उरुग्वेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.
सुआरेझ आणि विवादाचे पूर्वीपासूनचे नाते : अल वक्राह येथे दक्षिण कोरियाविरुद्धचा शेवटचा सामना ३-२ असा जिंकणाऱ्या घानाला अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. अनिर्णित राहूनही संघ बाद फेरीत स्थान मिळवू शकला असला तरी त्यासाठी दक्षिण कोरिया आणि पोर्तुगाल यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्याच्या घाना संघातील कर्णधार आंद्रे आय्यू हा एकमेव खेळाडू आहे जो 2010 च्या संघाचा भाग होता. 35 वर्षीय सुआरेझचा हा शेवटचा विश्वचषक असून यावेळी त्याचा संघ गट टप्प्यातून बाहेर पडू इच्छित नाही. त्याने उरुग्वेसोबत कोपा अमेरिकाचे विजेतेपद पटकावले आहे. लुईस सुआरेझ फुटबॉलमधील सर्वात वादग्रस्त खेळाडूंपैकी एक आहे. ब्राझीलमध्ये 2014 च्या विश्वचषक स्पर्धेत इटलीचा बचावपटू ज्योर्जिओ चियेलिनीच्या खांद्यावर चावल्याबद्दल चार महिन्यांच्या बंदीसह विरोधी खेळाडूंना चावल्याबद्दल त्याच्यावर तीन वेळा बंदी घालण्यात आली आहे.
उरुग्वेला बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी घानाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल आणि आशा ठेवावी लागेल की, कोरियाचा संघ पोर्तुगालला हरवू शकणार नाही. उरुग्वे आणि कोरिया दोन्ही जिंकल्यास, बाद फेरीत जाणारा संघ गोल फरकावर ठरवला जाईल.
सामन्याची वेळ : 2 डिसेंबर 2022 - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30, अल जानोब स्टेडियम
पोर्तुगाल विरुद्ध दक्षिण कोरिया : सलग दोन सामन्यात दोन विजयांसह पोर्तुगालसाठी विश्वचषकाची सुरवात यापेक्षा चांगला होऊ शकला नसती. आज ते दक्षिण कोरियाविरुद्धच्या त्यांच्या गट एचच्या लढतीत एक गुण मिळवून ग्रुपमध्ये अव्वल स्थान निश्चित करू इच्छित आहेत, जेणेकरून अंतिम 16 मध्ये त्यांचा सामना बलाढ्य ब्राझीलशी होणार नाही.
रविवारी उरुग्वेवर २-० ने विजय मिळविल्यानंतर, पोर्तुगालचे कोच सॅंटोसने सांगितले की ते दक्षिण कोरियाविरुद्ध अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची योजना आखत आहे. मँचेस्टर युनायटेडसाठी या मोसमात जास्त वेळ न खेळलेल्या 37 वर्षीय स्ट्रायकर रोनाल्डोने नऊ दिवसांत तीन सामने खेळले आहेत. रोनाल्डो जिममध्ये सराव करत असताना बुधवारी संघाच्या प्रशिक्षण सत्रात दिसला नाही.
सामन्याची वेळ : 2 डिसेंबर २०२२ - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री ८.३०, एज्युकेशन सिटी स्टेडियम