दोहा : कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये पोर्तुगालने आधीच बाद फेरी गाठली आहे. त्यामुळे त्यांचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो दक्षिण कोरियाविरुद्धच्या (Cristiano Ronaldo) शेवटच्या गट सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. रोनाल्डो सराव करतो आहे, मात्र जर तो खेळासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल तरंच खेळेल, असे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सँटोस (Fernando Santos) यांनी सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले. मला वाटते की त्याच्या खेळण्याची शक्यता 50-50 आहे. प्रशिक्षणानंतर आम्ही निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
रोनाल्डोवर कोरियाचे फॅन्स नाराज : योनहॅपने दिलेल्या वृत्तानुसार, सोलमध्ये जुव्हेंटस क्लबच्या प्रदर्शनीय सामन्यात सुमारे 65,000 चाहत्यांसमोर न खेळल्याने रोनाल्डोच्या प्रती दक्षिण कोरियाच्या फुटबॉल चाहत्यांमध्ये नाराजी आहे. सॅंटोस म्हणाले की, त्या घटनेबद्दल कोणतेही प्रश्न रोनाल्डो आणि जुव्हेंटसला विचारले पाहिजेत. माझ्या मते रोनाल्डोला दक्षिण कोरियातील लोक आणि खेळाडूंबद्दल खूप आदर आहे. पोर्तुगालने ग्रुप एच मध्ये घानाचा 3-2 आणि नंतर उरुग्वेचा 2-0 असा पराभव करून बाद फेरीत स्थान निश्चित केले आहे.
दक्षिण कोरियाला विजय आवश्यक : दुसरीकडे घानाकडून ३-२ ने पराभूत होण्यापूर्वी दक्षिण कोरियाने उरुग्वेसोबत गोलरहित बरोबरी साधली होती. दक्षिण कोरियाला बाद फेरी गाठायची असेल तर आजच्या सामन्यात पोर्तुगालला हरवावे लागेल आणि त्यानंतर उरुग्वे घानाला हरवेल किंवा सामना अनिर्णित राहील अशी आशा बाळगावी आहे. सँटोस म्हणाले की पोर्तुगाल जिंकण्याचा प्रयत्न करेल. परंतु मागील दोन सामन्यांच्या तुलनेत यावेळी संघात काही बदल करू शकतात, असेही संकेत त्यांनी दिले.
पोर्तुगालचे खेळाडू थकलेले आहेत : सॅंटोस पुढे म्हणाले, आमच्या काही खेळाडूंना थकवा जाणवत आहे. त्यामुळे आमची स्टार्टिंग लाइनअप कशी असेल याचा मी विचार करेन. दक्षिण कोरियाचा संघ देखील मजबूत आहे. त्यांचे खेळाडू वेगवान आहेत. तसेच त्यांची संरक्षण रेषा अतिशय सुव्यवस्थित आहे. पोर्तुगाल गट एच मध्ये अव्वल राहिल्यास अंतिम १६ मध्ये ब्राझीलचा सामना करणे टाळेल. सॅंटोस म्हणाले की, आगामी सामन्यांसाठी आम्ही आमच्या खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या तयार करण्यावर भर देत आहोत. पोर्तुगालचा पहिला बाद फेरीचा सामना पुढील मंगळवारी होणार आहे.