रत्नागिरी - खो- खो मधील राष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतार आणि आंतरराष्ट्रीय पंच समीर काबदुले यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. अपेक्षाला उत्कृष्ट महिला खेळाडू तर, काबदुले यांना कार्यकर्ता संघटक पुरस्कार देण्यात येणार आहे.
हेही वाचा - विश्वविजेत्या इंग्लडने केल्या तब्बल ५ लाख धावा!
क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी दरवर्षी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे पुरस्कार देऊन गौरव केला जातो. महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हास्तरावरील गुणवंत खेळाडू, कार्यकर्ते यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. रविवारी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावातून जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर यांनी चार पुरस्कारांसाठी नावे जाहीर केली. त्यात गुणवंत खेळाडू अविनाश गजानन पवार, गुणवंत खेळाडू महिला अपेक्षा अनिल सुतार, क्रीडा मार्गदर्शक शशांक शांताराम घडशी तर कार्यकर्ता संघटक समीर दशरथ काबदुले यांचा समावेश आहे. जिल्ह्यात खो-खोचा प्रचार-प्रसारासह राष्ट्रीय खेळाडू, पंच, मार्गदर्शक, प्रशिक्षक, क्रीडा कार्यकर्ता म्हणून काबदुले यांनी गेली अनेक वर्षे काम केले आहे. संपुर्ण जिल्ह्यात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून खो-खो खेळाला उज्ज्वल यश मिळवून दिले. क्रीडा मंडळ, क्रीडांगण, व्यायामशाळा, स्पर्धा नियोजन खेडोपाडी करून खो-खोचा विकास करण्यात त्यांचे योगदान आहे
त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान मिळवणारी रत्नागिरीची राष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतारचा जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वात लहान वयात पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा मान अपेक्षाने पटकावला. आतापर्यंत तेराहून अधिक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले असून सुवर्णमय कामगिरी केली आहे.
या दोघांनाही मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदिप तावडे, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, विनोद मयेकर, माजी खो-खो खेळाडू तथा शिवसेनेचे शहर संघटक प्रसाद सावंत यांच्यासह जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.