नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले दीपक पुनिया आणि रवि कुमार दहिया १७ फेब्रुवारीपासून नवी दिल्ली येथे सुरू होणाऱ्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या दोघांनीही इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या केडी जाधव हॉलमध्ये आयोजित कुस्ती चाचणीत आपले स्थान निश्चित केले.
हेही वाचा - 'माझा कोच बलात्काराचा प्रयत्न करतो'..महिला क्रिकेटरची गौतमकडे 'गंभीर' याचना
दीपकने ८६ किलो गटात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा -२०१४ मधील पदकविजेत्या पवन कुमारचा पराभव करत आशियाई चॅम्पियनशिपसाठी पात्रता दर्शवली. रविने ५७ किलो गटात हवाई दलाच्या पंकजचा १०-० ने पराभव केला.
मला पूर्ण आत्मविश्वास आणि आशा आहे की मी माझा चांगला फॉर्म कायम ठेवेन. ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे, परंतु त्यासाठी मला सातत्याने चांगली कामगिरी करून आगामी स्पर्धांमध्ये खेळणे आवश्यक असल्याचे दीपकने एका निवेदनात म्हटले. पात्र ठरल्यानंतर रविनेही आपली प्रतिक्रिया दिली. 'मला कुस्तीचा आनंद आहे आणि ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात योग्य वेळ आहे. हा फॉर्म कायम ठेवण्याचा आणि ऑलिम्पिकसह माझ्या देशासाठी पदके जिंकण्याचा माझा प्रयत्न आहे', असे रवीने स्पष्ट केले.