नवी दिल्ली - भारताची स्टार महिला बॉक्सिंगपटू आणि सहावेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या एमसी मेरी कोमची देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर ऑलिम्पिकमध्ये भारताची रौप्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
हेही वाचा - विश्वविजेत्या इंग्लडने केल्या तब्बल ५ लाख धावा!
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. २००६ मध्ये मेरीला पद्मश्री, तर, २०१३ मध्ये तिला पद्मभूषणने गौरवण्यात आले होते. मेरी कॉमने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. ते तिचे एकूण आठवे पदक होते. मेरी कोमने या स्पर्धेत सहा सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले आहे.
सिंधूनेही गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरली. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकही जिंकले.