दुबई - युवा आणि ज्यूनियर बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंची सलग दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी कायम आहे. दुबईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज रविवारी भारताच्या बिश्वमित्र चोंगथम याने 51 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली. याशिवाय आणखी तीन खेळाडूंनी कास्य पदक पक्के केले आहे.
विश्व युवा चॅम्पियनशीपमध्ये कास्य पदक विजेता बिश्वमित्र याने उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानच्या मुरातुल याचा पराभव केला. त्याने टेकनिकल गुण आणि शानदार खेळ करत हा सामना 5-0 असा एकतर्फा जिंकला.
विश्वमित्र शिवाय इतर बॉक्सिंगपटू अभिमन्यू लॉरा (92 किलो), दीपक (75 किलो) आणि प्रीती (67 किलो) यांनी देखील उपांत्य फेरीत धडक देत पदक निश्चित केलं आहे.
मिडलवेट उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दीपकने इराणच्या धुर्गाम करीम यांचा पराभव केला. दीपकने या सामन्यात संपूर्ण वर्चस्व गाजवले. तिसऱ्या राउंडमध्ये दीपकने करीमला जोरदार पंच मारले. यामुळे पंचांना सामना रोखावा लागला होता.
अभिमन्यू लॉरा याने एकतर्फा सामन्यात किर्गिस्तानच्या संजारचा पराभव करत अंतिम 4 मध्ये स्थान मिळवले. दुसऱ्या फेरीतच पंचांनी सामना रोखत अभिमन्यूला विजेता ठरवले.
महिला गटात प्रितीने दमदार कामगिरी केली. तिने सामना एकतर्फा जिंकत उपांत्य फेरीत धडक दिली.
दुसरीकडे आदित्य जंघू (86) ला उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्याचा कझाकिस्तानच्या तेमरलान मुकातायेव याने पराभव केला.
तिसऱ्या दिवशी कृष पाल (46 किलो), आशिष (54 किलो), अंशुल (57 किलो), प्रीत मलिक (63 किलो) आणि भरत जून (81 किलो) यांचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहेत. तर गौरव सैनी 70 किलो वजनी गटात उपांत्य फेरीचा सामना खेळेल.
हेही वाचा - भारतीय दिग्गज फुटबॉलपटू सईद शाहिद हकिम यांचे निधन
हेही वाचा - राहुल द्रविड यांच्या देखरेखीत एनसीएमध्ये प्रशिक्षकांना दिलं जातंयं कॉर्पोरेट शिक्षण