नवी दिल्ली - बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (बीएफआय) प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी अमित पांघल आणि विकास कृष्णन यांची शिफारस केली आहे. “भारतीय बॉक्सिंग महासंघाने गेल्या चार वर्षांतील खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीचा विचार केला आहे”, असे बीएफआयने म्हटले.
महासंघाने अर्जुन पुरस्कारासाठी महिला बॉक्सर सिमरनजित कौर, लवलिना बोरगोहेन आणि मनीष कौशिक यांच्या नावांची शिफारस केली आहे, तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी एन. उषा यांची नावे पाठवली गेली आहेत. त्यांच्याशिवाय छोटा लाल यादव आणि मोहम्मद अली कमर यांची नावेही द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाठवली गेली आहेत.
अमितने गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. या व्यतिरिक्त त्याने 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक आणि त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
28 वर्षीय विकासने 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याच वर्षी त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले होते. दिग्गज बॉक्सर विजेंद्रसिंगनंतर तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेला विकास हा दुसरा भारतीय बॉक्सर आहे. 2012 मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले.