नवी दिल्ली - भारतीय बास्केटबॉलचा चेहरा अशी ओळख असलेला सतनाम सिंग भामरा याचे निलंबन झाले आहे. सतनामवर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे उत्तेजक द्रव्य प्रतिबंधात्मक संस्थेतर्फे (नाडा) तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सतनामची २०१५ मध्ये एनबीए संघात निवड झाली होती. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला बास्केटबॉलपटू ठरला होता.
हेही वाचा - कितनी बार बोला था विराट को मत छेड.., बिग बींच्या 'त्या' ट्विटवर विराटचे उत्तर
बंगळूरु येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सराव शिबिरादरम्यान सतनामची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. या चाचणीत प्रतिबंधात्मक घटकांचे अंश आढळले आहेत. '११ नोव्हेंबर रोजी झालेल्या चाचणीl सतनाम दोषी आढळला असून १९ नोव्हेंबरपासून त्याच्या निलंबनाचा काळ सुरू झाला आहे. त्याशिवाय पुढील तीन महिन्यांत उत्तेजक प्रतिबंधक शिस्तपालन समितीनेही त्याला दोषी ठरवल्यास त्याच्यावरील हा निलंबनाचा काळ किमान ४ वर्षे लांबू शकतो,’ असे नाडाने निवेदनपत्रात म्हटले आहे.
सतनामने १ डिसेंबरपासून सुरू झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही माघार घेतली आहे. आशियाई अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सतनामने भारताचे प्रतिनिधित्व केले असून २०१९च्या विश्वचषक बास्केटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतही तो खेळला होता.