नवी दिल्ली - ऑनलाइन शूटिंग लीगमध्ये ऑस्ट्रियन रॉक्सने शनिवारी इंडियन टायगर्सला 10–4 असे हरवत उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
ऑस्ट्रियन नेमबाजांनी या सामन्यात सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. भारतीय नेमबाज फक्त चार गुण मिळवू शकले. पॅरालिम्पिक असोसिएशन ऑफ इंडियाने (पीसीआय) मान्यता दिलेल्या भारतीय संघात कृष्णा कुमार, ज्योती सानाकी, ईशांक आहुजा या नेमबाजपटूंचा समावेश होता. 2019च्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कृष्णा कुमारने रौप्यपदक जिंकले आहे. तर, याच चॅम्पियनशिपमधील महिला विभागात 10 मीटर एअर रायफलमध्ये ज्योती सानाकीने रौप्यपदक पटकावले आहे.
इटेलियन शैली, फ्रेंच फ्रॉग्ज आणि स्पॅनिश चानोस यांनीही उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीचा सामना 18 ते 19 दरम्यान आणि अंतिम फेरी 26 जुलै रोजी खेळवली जाईल.
या लीगमधील पहिल्या सामन्यातही भारतीय पॅरालिम्पिक नेमबाजी संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या लीगच्या सामन्यात इटेलियन स्टाइल टीमने इंडियन टायगर्सला 10-1ने पराभूत केले होते.