नवी दिल्ली - शुक्रवारी क्रीडा मंत्रालयाने यावर्षीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले. या मध्ये धावपटू द्युती चंदचाही समावेश असून तिला यावर्षीचा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. अर्जुन पुरस्कारामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करण्यास आणखी प्रोत्साहन मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया द्युतीने दिली आहे.
२४ वर्षीय द्युतीने २०१८च्या आशिआई स्पर्धांमध्ये १०० मीटर आणि २०० मीटर प्रकारामध्ये रजत पदक मिळवले होते. ११.२२ सेकंद ही तिची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. पात्रता फेरीतील अंतर ११.३२ सेकंदात पार करून द्युतीने रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता. यावेळी पात्रता फेरी पार करण्यासाठी तिला ११.१५ सेकंदांचाच कालावधी मिळणार आहे.
तुमच्या कुठल्याही कामगिरीची शासनाकडून दखल घेतली जाणे, ही एका खेळाडूसाठी खूप मोठी गोष्ट आहे. मिळणारे पुरस्कार हे तुम्हाला प्रोत्साहित करण्यात मोठी भूमिका निभावत असतात. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकची तयारी सुरू असताना मिळालेला अर्जुन पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे द्युतीने सांगितले.
११.१५ सेकंदात अंतर कापून पात्र फेरी पार करणे ही कठीण बाब आहे. मात्र, देशासाठी मी माझ्यापरीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, असेही द्युती म्हणाली.
द्युती सोबत बॅडमिंटनपटून सात्विक साईराज रांकरेड्डी, क्रिकेटपटू इशांत शर्मा, नेमबाज मनू भाकेर यांनाही यावर्षीचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.