मुंबई : जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्स्प्रेस' म्हणजेच ललिता शिवाजी बाबर. आजपर्यंत अनेक पदकांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. ललिता शिवाजी बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार असून, हा तिचा पहिलाच बायोपिक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. प्लॅनेट मराठी आणि एंडेमॅाल शाईन इंडिया यांची निर्मिती असलेला हा मराठीतील एक भव्य सिनेमा असेल.
ललिता बाबर यांची अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा चित्रपट : 'ललिता शिवाजी बाबर' त्यांची ही अतुलनीय कामगिरी जगासमोर आणणारा चित्रपट असून, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषि नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. आजवर अनेक हिंदी शोज, चित्रपट राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवल्यानंतर 'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाच्या निमित्ताने एंडेमॉल शाईन इंडिया मराठीत पदार्पण करत आहेत.
ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या पहिल्या धावपटू : 'ललिता बाबर' यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणाली, ''एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही. ऑलिम्पिक ट्रॅकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारतातील त्या पहिल्या धावपटू आहेत. त्यांच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंदही आहे. अशा मोठ्या व्यक्तिमत्वाची भूमिका साकारण्याचा सर्वोच्च मान मला मिळाला आहे आणि याचा खूप आनंद आहे. मागील दीड वर्षांपासून मी ललिता बाबर यांच्या संपर्कात आहे. त्यांची देहबोली, त्यांचा स्वभाव, त्यांचा सराव, एक व्यक्ती म्हणून त्यांचे वावरणे, या सगळ्या बारकाव्यांचा मी अभ्यास करतेय. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतेय, जेणे करून मी त्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय देऊ शकेन.’’
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी केले कौतुक : प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "ललिता शिवाजी बाबर यांची आजवरची कारकीर्द पाहता या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यासाठी प्रजासत्ताक दिनासारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. आज या चित्रपटाचे पोस्टर झळकवून आम्ही त्यांच्या कारकिर्दीला सलाम करीत आहोत.’’
हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे : एंडेमॅालचे शाईन इंडियाचे गौरव गोखले म्हणाले, ‘’अनेक प्रादेशिक, राष्ट्रीय चित्रपट आम्ही केले आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही मराठी प्रादेशिक चित्रपट करीत आहोत. आम्हाला हा प्रोजेक्ट एका आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा आहे. जेणेकरून जगभरातील प्रेक्षक हा चित्रपट पाहू शकतील. अमृतासारखी गुणी अभिनेत्री ही भूमिका साकारतेय, म्हणजे ‘ललिता शिवाजी बाबर’ला शंभर टक्के न्याय मिळणार, हे नक्की. अमृता मुळात खिलाडू वृत्तीची असल्याने ही भूमिका ती योग्यरित्या साकारेल, याची खात्री आहे.’’ पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी 'ललिता शिवाजी बाबर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.