नवी दिल्ली - अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) सोमवारी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फेडरेशन चषक पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. फेडरेशन चषक पुढील महिन्यात १० ते १३ एप्रिल दरम्यान पंजाबच्या पटियाला येथे होणार होता. 'देश आणि जगाची सद्य परिस्थिती लक्षात घेऊन कोणतीही स्पर्धा आयोजित करणे अवघड आहे', असे एएफआयचे अध्यक्ष आदिले सुमारिवाला यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा - जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण?...विंडीजच्या चंद्रपॉलने दिलं 'हे' उत्तर
'आरोग्य आणि सुरक्षा ही प्रत्येकाची प्राथमिकता आहे. एकदा गोष्टी व्यवस्थित झाल्या की आपण त्याची सुरुवात करू शकतो. इंडियन ग्रां प्री आणि फेडरेशन कपच्या नवीन तारखा काय असतील, हे आम्ही सध्या सांगू शकत नाही', असेही सुमारिवाला यांनी सांगितले आहे.
यापूर्वी एएफआयने कोरोनामुळे भारतीय ग्रां.प्री. रद्द केली. इंडियन ग्रां. प्री. देशाच्या तीन भागात आयोजित केली जाणार होती. दरम्यान, कोरोनाच्या धोक्यामुळे इंडियन प्रीमियर लीगसह अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही मलिका रद्द करण्यात आल्या आहेत.