मुंबई - गुजरातमधील वडोदरा येथे पार पडलेल्या पाच राज्यांच्या पश्चिम विभाग शॉटगन शूटिंग स्पर्धेत पालघरच्या अभिषेक पाटील याने सुवर्णकामगिरी केली आहे. त्याने डबल ट्रॅप पुरुष ज्युनियर गटात सुवर्णपदक, डबल ट्रॅप सिनियर पुरुष गटात सुवर्णपदक तर सिंगल ट्रॅप स्पर्धेत ज्युनियर पुरुष गटात कांस्य पदक अशी एकूण तीन पदके पटकावली आहेत.
पालघर जिल्ह्यातील क्रीडा विश्वाचा झेंडा अटकेपार रोवल्याबद्दल अभिषेकचे कौतुक होत आहे. यापूर्वी पुणे येथे झालेल्या राज्य शूटिंग चॅम्पियनशीप ज्युनियर तसेच सिनियर पुरुष गटात अभिषेकने सुवर्णपदक पटकावून आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी अभिषेकची निवड झाली आहे. या स्पर्धेअगोदर, सप्टेंबर महिन्यात जयपूर येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तो भाग घेणार आहे. या स्पर्धेत देखील अभिषेक चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्याच्या पालकांनी व्यक्त केला आहे.
अभिषेकचा नेमबाजीतील प्रवास -
पालघर तालुक्यातील गोवाडे येथील अभिषेक पाटील याने दहावीनंतर नेमबाजी स्पर्धेत पहिल्यांदा पदार्पण केले. त्याची बहीण पूजा पाटील हीदेखील राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असून, त्याने आपली बहिण व वडील समीर पाटील यांच्याकडून नेमबाजीचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर अभिषेक यांनी राज्य स्तरीय नेमबाजी स्पर्धेत पदार्पण केले.
गोवाडे येथे आधुनिक असे नेमबाजीचे संकुल तयार होत असून, अभिषेक तेथेच नेमबाजीचे धडे घेत आहे. अभिषेक पालघर येथील सोनोपंत दांडेकर विद्यालयात अकरावी कॉमर्स च्या वर्गात शिक्षण घेत असून, नेमबाजीत आपल्याला ओलम्पिकपर्यंत मजल मारण्याची त्याची इच्छा आहे. अभिषेकने गुजरात येथील नेमबाजी स्पर्धेत केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.