नाशिक - मनमाड शहरात आज ६७ व्या जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण ४४ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा साखळी व बाद या दोन्ही पद्धतीने खेळवण्यात येणार असून हे सामने दिवस-रात्र सुरू राहणार आहेत.
नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाहक राजेंद्र पगारे, मनमाड कॉलेजचे प्राचार्य जगदाळे, दिलीप नरवडे, सुधाकर मोरे, पापा थॉमस आणि कैलास आहिरे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरूवात झाली. प्रमुख पाहूण्यांनी मैदानात नारळ फोडून स्पर्धेचा शुभारंभ केला.
साखळी व बाद या दोन्ही पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेत ४४ संघानी सहभाग नोंदवला आहे. दोन गटात ही स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेसाठी ३२ पंच काम पाहणार आहेत. पंच प्रमुख म्हणून सतिष सुरवंशी तर सहायक पंच प्रमुख म्हणून शाकिर खान हे काम पाहत आहेत. दरम्यान, ही स्पर्धा ३ दिवस रंगणार आहे.
जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून निवडलेल्या संघ चिपळूण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मनमाड शहरातून मोठ्या प्रमाणावर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार झालेले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा - SAG2019 : पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला 'खो-खो' संघाची सुवर्णपदकाला गवसणी
हेही वाचा - बारामतीचे सतीश ननवरे तिसऱ्यांदा 'आयर्नमॅन'