टोकियो - भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बलाढ्य अर्जेंटिनाचा पराभव केला. अर्जेंटिनाचा संघ रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता आहे. अशा बलाढ्य संघाला भारतीय संघाने 3-1 अशा फरकाने धूळ चारली. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
भारतीय संघाने अर्जेंटिनाविरुद्ध सुरूवातीपासून जोरदार खेळ केला. सामन्यातील पहिला क्वार्टर गोलरहित राहिला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील दोन्ही संघाना गोल करता आला नाही. यामुळे गोलफलक ०-० असा बरोबरीत राहिला. पण तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर भारताने गोल करत 1-0 अशी आघाडी मिळवली. सामन्याच्या 43 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरवर भारताच्या वरुण कुमारने हा गोल केला.
भारताने घेतलेली ही आघाडी काही मिनिटे टिकली. ४८ व्या मिनिटाला अर्जेंटिना संघाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर मॅको स्कूथ याने गोल करत अर्जेंटिनाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. अखेरच्या दहा मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. यात ५८ व्या मिनिटाला विवेक सागरने अप्रतिम मैदानी गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर पुढच्याच ५९ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने कॉर्नरवर गोल करत भारताचा विजय पक्का केला.
टोकियो ऑलिम्पिकमधील चार सामन्यांमधील भारताचा हा तिसरा विजय आहे. भारताने न्यूझीलंड, स्पेन आणि अर्जेंटिना या संघाचा पराभव केला आहे. तर केवळ ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान, भारताचा साखळी फेरीतील अखेरचा सामना ३० जुलै रोजी यजमान जपानविरूद्ध होणार आहे.
भारतीय संघ ग्रुप ए मध्ये दुसऱ्या स्थानावर -
भारतीय संघ ग्रुप ए मध्ये तीन विजयासह 9 गुण मिळवत दुसरे स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया सर्वच्या सर्व ४ सामने जिंकून १२ गुणासह अव्वल स्थानावर आहे. तर स्पेन न्यूझीलंड आणि अर्जेंटिनाच्या खात्यात प्रत्येकी ४ गुण आहेत. पण, गोल सरासरीच्या जोरावर स्पेन तिसऱ्या, न्यूझीलंडने चौथ्या आणि अर्जेंटिना पाचव्या स्थानावर आहे. यजमान जपान एक गुणासह तळाशी आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics: भारत 2 आणखी पदक जिंकण्याच्या जवळ पोहोचला; दीपिका आणि पूजाची दमदार कामगिरी
हेही वाचा - शेतकऱ्याच्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण; सचिन तेंडुलकरने केली मदत