मुंबई - टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघाची कमान राणी रामपालकडे सोपवण्यात आली आहे. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये या संघाकडून पदकाची आपेक्षा आहेत. यादरम्यान, कर्णधार राणी रामपाल हिच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. यात तिने आमचा संघ कोणत्याही संघाला पराभूत करण्यास सक्षम असल्याचे सांगितलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या दबावाविषयी विचारले असता राणी म्हणाली, कोणता संघ ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करू शकेल, याचा अंदाज लावणे कठीण आहे. आम्ही चांगला सराव करत असून आमच्यावर देखील दबाव आहे. जो संघ दबाव झुगारून चांगले प्रदर्शन करेल, हे महत्वाचे आहे. आम्ही जर चांगले प्रदर्शन केले तर आम्ही नक्कीच विजय मिळवू.
आमच्या प्रशिक्षकांनी भरपूर कष्ट घेतले आहेत. यात त्यांनी दबावात कसा खेळ करावा, यावर खास मेहनत घेतली आहे. दबाव प्रत्येकावर असतो. सोबत तुम्ही अशा गोष्टींसाठी उत्साहित असता. जर असे नसेल तर तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे आणि तुम्ही मोठ्या स्पर्धेसाठी तयार नाहीत. तुम्ही तुमच्या खेळावर फोकस केले पाहिजे, असेही राणीने सांगितलं.
काही दिवसांपूर्वी महिला हॉकी संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यात राणी देखील कोरोना पॉझिटिव्ह होती. याविषयी राणीला विचारले असता राणी म्हणाली, मला कोरोनामधून सावरण्यासाठी वेळ लागला. मी क्वारंटाईनमध्ये होते. या दरम्यान खेळाडूंना आवश्यक असलेली प्रक्रियेचे मी पालन करत होते. हे सोप नव्हतं. १४ दिवसानंतर आम्ही सरावाला हळू हळू सुरूवात केली. तेव्हा मी सुरूवातीला थोडासा देखील सराव करू शकत नव्हते. यामुळे मला फिट होण्यासाठी किती वेळ लागेल. याची खात्री नव्हती. प्रशिक्षकांनी सरावाची योजना आखत आमच्याकडून सराव करून घेतला. आता आम्ही पूर्णपणे फिट आहोत.
आमचे लक्ष्य पहिले उपांत्यपूर्व फेरी गाठणे आहे. यासाठी आम्ही योजना आखू. मी करियरचा शेवट चांगला करू इच्छिते. माझे स्वप्न ऑलिम्पिक किंवा विश्व करंडक जिंकण्याचे आहे, असे देखील राणीने सांगितलं. दरम्यान, भारतीय संघ राणीच्या नेतृत्वात टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे.
हेही वाचा - Ban vs Zim Test : १५० धावा करून ठरला संकटमोचक; मैदानाबाहेर जाताच केली निवृत्ती जाहीर
हेही वाचा - Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, 'या' दिवसापासून मालिकेला सुरूवात, पण...