नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारत विरुद्ध बेल्जियम हा उपांत्य फेरीतील हॉकी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाचा पराभव झाला. बेल्जियमने या सामन्यात भारताला 5-2 अशी मात दिली. दरम्यान, हा सामना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीवर पाहिला. पराभवानंतर मोदी यांनी ट्विट करत भारतीय संघाचे मनोबल वाढवले. तसेच कर्णधार मनप्रीत सिंह याच्याची फोनवर चर्चा देखील केली.
सामना पाहत असल्याचे मोदींनी ट्विट करत सांगितलं -
बेल्जियम विरुद्ध भारत सामना सुरू असताना मोदी यांनी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणाले की, 'मी टोकियो ऑलिम्पिकचा भारत विरुद्ध बेल्जियम हॉकी पुरूष उपांत्य फेरीचा सामना पाहात आहे. मला आपला संघ आणि संघाच्या कौशल्याचा अभिमान आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा'
पराभवानंतर मोदींनी वाढवलं भारतीय संघाचं मनोबल -
भारतीय संघ बेल्जियमकडून पराभूत झाला. यानंतर मोदींनी ट्विट करत भारतीय खेळाडूंची मनोबल वाढवले. मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'हार-जीत हा जीवनाचा भाग आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या पुरूष हॉकी संघाने सर्वश्रेष्ठ दिलं आणि हेच महत्वाचं आहे. संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूवर अभिमान आहे.'
मोदींनी केली कर्णधार मनप्रीत सिंहची फोनवरून बातचित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपांत्य सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह याच्याशी फोनवरुन बातचित केली. यात त्यांनी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केलं आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
भारताने असा गमावला सामना
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत बेल्जियमकडून पराभव झाला. बेल्जियमने हा सामना 5-2 अशा फरकाने जिंकला. या पराभवासह तमाम भारतीयांचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहेत. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये चांगला खेळ करणाऱ्या भारतीय संघाला अखेरच्या क्वार्टरमधील चूका भोवल्या आणि भारताने हा सामना गमावला.
हेही वाचा - Tokyo Olympics (Women's Hockey): ऑस्ट्रेलियाला 1-0 ने नमवत भारताची उपांत्य फेरीत धडक
हेही वाचा - Tokyo Olympics : जय हो! भारताला आणखी एक पदक; पी. व्ही. सिंधू कांस्य पदकाची मानकरी