टोकियो - भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. ते ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदा उपांत्य फेरीत पोहोचले होते. पण त्यांना उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून तर कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनकडून पराभूत व्हावं लागलं. ऑलिम्पिक पदक हुकल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंना अश्रू अनावर झाले आणि मैदानावर त्यांचा बांध फुटला. गोलकिपर सविता पुनिया, वंदना कटारिया, कर्णधार राणी रामपाल आणि नेहा गोयल यांच्यासमवेत संघातील सर्व खेळाडू भावूक झाले होते.
भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. कास्य पदकाच्या लढतीनंतर ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतूक केलं आणि भारतीय खेळाडूंचा टाळ्या वाजवत सन्मान केला. तसेच ग्रेट ब्रिटनच्या महिला खेळाडूंनी अश्रू अनावर झालेल्या भारतीय महिलांना धीर दिला. याशिवाय ग्रेट ब्रिटनच्या हॉकी संघाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुनही भारतीय संघाच्या खेळाचे कौतुक करण्यात आलं आहे.
ग्रेट ब्रिटनने ट्विट करत भारतीय संघाचे केलं कौतुक -
कास्य पदकाच्या सामन्यात भारताचा ग्रेट ब्रिटनकडून पराभव झाला. यानंतर ग्रेट ब्रिटन हॉकी संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन भारतीय संघाचे कौतुक करणारे ट्विट करण्यात आलं आहे. यात ते म्हणतात, "हा कमाल खेळ आहे आणि अप्रतिम प्रतिस्पर्धी देखील. हॉकी इंडिया तुम्ही टोकियो २०२० मध्ये खास कामगिरी केली. तुमचा येणारा पुढील काळ उज्ज्वल दिसत आहे."
यासोबत ग्रेट ब्रिटनने टाळी वाजवतानाचा इमोजी देखील आपल्या ट्विटमध्ये जोडला आहे. दरम्यान, ग्रेट ब्रिटनच्या या ट्विटला भारतीय संघाने देखील रिप्लाय दिला आहे. यात त्यांनी, शानदार खेळ होता. कास्य पदकाबद्दल अभिनंदन, असे म्हटलं आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय मुलींची छाप, 6 खेळाडूंनी डागले 12 गोल
हेही वाचा - Tokyo Olympics : भारताला गोल्फमध्ये मिळणार सुवर्ण पदक? अदिती अशोक पदकाजवळ पोहोचली