नवी दिल्ली - रानी रामपालच्या नेतृत्वात भारतीय महिला हॉकी टीम रविवारी अर्जेंटीनाच्या दौऱ्यावर रवाना झाली. भारतीय हॉकी टीम कोविड-19 महामारीमुळे जवळपास एक वर्षाच्या विश्रांतीनंतर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
कोरोना महामारीमुळे कोणतीही आतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भारतीय संघाला बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात सरावावरच समाधान मानावे लागले.
भारतीय टीम जगातील दुसऱ्या नामांकित अर्जेंटीना संघाबरोबर चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. 26, 28, 30 आणि 31 जानेवारी रोजी हे सामने खेळले जातील. त्यापूर्वी भारतीय टीम अर्जेंटीना जूनियर टीम आणि बी टीमविरुद्ध सराव सामने खेळेल.
रानीने टीम रवाना होण्यापूर्वी सांगितले, की पुन्हा दौऱ्यावर जाताना चांगले वाटत आहे. मागील काही महिन्यांपासून आम्ही खेळावर खूपच मेहनत घेतली आहे. आता वेळ आली आहे, की आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगले प्रदर्शन करावे.
सध्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळणे थोडेसे बदलेले आहे. आम्हाला जैव सुरक्षित वातावरणात रहावे लागेल. मात्र मैदानावर परतल्यामुळे टीम उत्साहित आहेत.
हॉकी इंडिया आणि अर्जेंटीना हॉकी संघ या दोन संघासाठी जैव सुरक्षित वातावरण तयार केले आहे. भारतीय टीम एका हॉटेलमध्ये थांबेल तेथे सर्वांसाठी वेगवेगळ्या रुम असतील.
रवाना होण्यापूर्वी संपूर्ण संघाची कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.