भुवनेश्वर - जागतिक स्पर्धेत ५ व्या स्थानी असलेल्या भारतीय संघाने, हॉकी प्रो-लीग स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारतीय संघाने स्पर्धेच्या पहिलाच सामन्यात, जागतिक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँडला ५-२ ने धूळ चारली.
यजमान भारतीय संघाने, पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ केला. गुरजंत सिंगने पहिल्या मिनिटाच्या १० सेंकदालाच मैदानी गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. यामुळे नेदरलँडचा संघ बॅकफूटवर गेला. त्यानंतर ललित उपाध्यायने नेदरलँडच्या पेनल्टी क्षेत्रात सुरेख चाल रचत, पेनल्टी कॉर्नर कमावला. भारताचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपालनेही या संधीचे सोने करत १२ व्या मिनीटाला चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताची आघाडी २-० ने वाढवली.
रुपिंदरपालच्या गोलनंतर अवघ्या दोन मिनिटात नेदरलँडने एक गोल केला. हा गोल, जीप जान्सनने नोंदवला आणि आघाडी २-१ ने कमी केली. दुसऱ्या सत्रात नेदरँलडने चांगले पुनरागमन केले. २८ व्या मिनीटाला जेरॉन हर्ट्झब्रेगरने गोल नोंदवत सामना २-२ ने बरोबरीत आणला.
तेव्हा भारतीय संघाने आक्रमणावर भर दिला आणि याचा फायदा संघाला झाला. ३४ व्या मिनीटाला मनदीप सिंग आणि ३६ व्या मिनीटाला ललित उपाध्यायने नेदरलँडची बचावफळी भेदत सुरेख मैदानी गोल झळकावले. यानंतर नेदरलँडचा संघ पुनरागमन करुच शकला नाही.
रुपरिंदरपालने ४६ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल झळकावत भारताची आघाडी ५-२ ने वाढवली. यानंतर नेदरलँडला गोल करता आला नाही. दरम्यान, भारत-नेदरलँड संघ आज (रविवार) पुन्हा समोरासमोर याच मैदानात लढणार आहेत.
हेही वाचा - न्यूझीलंड दौरा : राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व
हेही वाचा - भारतीय हॉकी संघाची डिफेंडर सुनिता लाकडाची निवृत्ती