मुंबई - टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. जगभरात ऑलिम्पिकची उत्सुकता पाहायला मिळत आहे. भारतीय पथक देखील ऑलिम्पिकसाठी जपानमध्ये काही दिवसांपूर्वीच पोहोचला आहे. या पथकातील खेळाडूंकडून भारतीयांना पदकांच्या आशा आहेत. या दरम्यान आम्ही तुम्हाला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देणाऱ्या खेळाडूंबद्दल माहिती देणार आहे.
- १९०० पॅरिस ऑलिम्पिक, नॉरमॅन गिलबर्ट प्रिचार्ट (रौप्य पदक) पुरूष २०० मीटर धावण्याची शर्यत
कोलकातामध्ये जन्मलेल्या ब्रिटिश मूल असलेल्या नॉरमॅन गिलबर्ट प्रिचार्ड याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरूष २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताला रौप्य पदक जिंकून दिले होते.
- १९०० नॉरमॅन गिलबर्ट प्रिचार्ट (रौप्य) पुरुष २०० मीटर हर्डल रेस
प्रिचार्ड याने पुरूष २०० मीटर हर्डल रेसमध्ये रौप्य पदक जिंकले होते. या कामगिरीसह तो भारताचा सर्वात यशस्वी अॅथलेटिकपटू बनला होता.
- १९२८ एम्स्टर्डन ऑलिम्पिक, भारतीय पुरूष हॉकी संघ (सुवर्णपदक)
- २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने तिसरा ऑलिम्पिक पदक जिंकले. जयपाल सिंह मुंडा यांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने अंतिम फेरीत नेदरलँडचा ३-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते.
- १९३२ लॉन्स एंजलिस ऑलिम्पिक, भारतीय पुरूष हॉकी संघ (सुवर्णपदक)
डिफेंडिंग चॅम्पियन भारतीय हॉकी संघाने पुन्हा एकदा सुवर्णपदकाची कमाई केली. १९३२ ऑलिम्पिकमध्ये भारताने जपानचा ११-१ ने धुव्वा उडवत सुवर्णपदक जिंकले होते. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व होते, लाल सिंह बोखारी यांच्याकडे.
- १९३६ बर्लिन ऑलिम्पिक, भारतीय पुरूष हॉकी संघ (सुवर्णपदक)
भारतीय संघाने या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक साधली. अंतिम सामन्यात भारताने यजमान जर्मनीचा ८-१ ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते.
- १९४८ लंडन ऑलिम्पिक, भारतीय पुरूष हॉकी संघ (सुवर्णपदक) -
१९३६ ऑलिम्पिकनंतर १२ वर्षे दुसऱ्या महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकली नाही. १९४८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनचा ४-० ने पराभव करत पुन्हा सुवर्णपदक जिंकले. यावेळी भारताला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले होते. यामुळे प्रथमच स्वतंत्र भारत ऑलिम्पिकमध्ये उतरला होता.
- १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक, भारतीय हॉकी संघ (सुवर्णपदक)
कुंवर दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने १९८४ ऑलिम्पिकमध्ये नेदरलँडचा ६-१ ने पराभव करत सलग पाचवे सुवर्णपदक जिंकले होते.
- १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिक, केडी जाधव (कांस्य पदक) फ्री स्टाईल बॅटनवेट रेसलिंग -
केडी जाधव यांनी स्वतंत्र भारतासाठी प्रथम वैयक्तिक मेडल जिंकले.
- १९५६ मेलबर्न ऑलिम्पिक, भारतीय हॉकी संघ (सुवर्णपदक) -
भारतीय संघाने या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा १-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते.
- १९६० रोम ऑलिम्पिक, भारतीय हॉकी संघ (रौप्यपदक) -
रोम ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा भारतीय हॉकी संघाला पाकिस्तान संघाकडून १-० ने पराभव पत्कारावा लागला आणि भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
- १९६४ टोकियो ऑलिम्पिक भारतीय हॉकी संघ (सुवर्णपदक)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पाकिस्तानचा १-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. मोहिंदर लाल यांच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळला होता.
- १९६८ मेक्सिोको ऑलिम्पिक, भारतीय हॉकी संघ (कांस्यपदक) -
भारतीय संघाला या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- १९७२ म्युनिख ऑलिम्पिक, भारतीय हॉकी संघ (कांस्यपदक) -
या ऑलिम्पिकमध्ये देखील भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
- १९८० मास्को ऑलिम्पिक, भारतीय हॉकी संघ (सुवर्णपदक) -
भारतीय संघाने वासुदेवन भास्कर यांच्या नेतृत्वात स्पेनचा १-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते.
- १९९६ अॅटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेसने टेनिस पुरूष एकेरीत कांस्य पदक जिंकले.
- २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरी हिने महिला ६९ किलो वेटिलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मल्लेश्वरी पहिली भारतीय महिला आहे.
- २००४ एथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन सिंह राठोड याने शुटिंग डबलमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
- २००८ बिजिंग ऑलिम्पकमध्ये अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू आहे. याच ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार याने ६६ किलो वजनी फ्री स्टाइल कुस्तीमध्ये कास्य पदक जिंकले. तसेच विजेंदर सिंहने बॉक्सिंगमध्ये कास्यपदकाची कमाई केली होती.
- २०१२ लंडन ऑलिम्पिक विजयकुमार याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्टर शूटिंग प्रकारात रौप्यपदक जिंकले. गगन नारंगने १० मीटर एअर रायफलमध्ये कास्यपदकाची कमाई केली. सायना नेहवाल हिने या ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत कास्य पदक जिंकले. मेरी कोमने देखील या ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले आहे. सुशील कुमार याने ६६ किलो वजनी गटात फ्री स्टाईलमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. तर योगश्वर दत्तला कास्य पदकावर समाधान मानावे लागले.
- २०१६ रियो ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक हिने महिला ५८ वजनी गटात फ्री स्टाइल कुस्तीमध्ये कास्य पदक जिंकले. तर पी व्ही. सिंधू या ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत रौप्य पदकाची कमाई केली होती.