मुंबई - हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२०-२१ हंगामाचा पहिला सामना २० नोव्हेंबरला गोव्याच्या बॅम्बोलम येथील जीएमसी अॅथलेटिक स्टेडियमवर होणार आहे. गतविजेते एटीके मोहन बागान आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यात हा सामना होणार आहे. आयएसएल आयोजक फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडने (एफएसडीएल) लीगच्या पहिल्या ११ फेऱ्यांच्या ५५ सामन्यांचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले.
सामने आणि स्टेडियम -
वेळापत्रकानुसार ईस्ट बंगालचा नवीन संघ २७ नोव्हेंबरला वास्को दि गामा येथील टिळक मैदान स्टेडियमवर एटीके मोहन बागान यांच्याशी सामन्याद्वारे प्रथमच लीगमध्ये आपली मोहीम सुरू करेल. लीगच्या सातव्या हंगामातील सर्व सामने प्रेक्षकांविना गोव्यातील फातोर्डा मधील जवाहरलाल नेहरू स्टेडियम, वास्को दि गामा मधील टिळक मैदान स्टेडियम आणि बॅम्बोलम मधील जीएमसी अॅथलेटिक स्टेडियमवर खेळले जातील. संपूर्ण स्पर्धा बायो सिक्योर बबलमध्ये होईल.
सामन्यांची संख्या -
लीगच्या नवीन संघाच्या आगमनाने आता सामन्यांची संख्या ११५ झाली आहे. लीगमधील सर्व ११ संघ डबल राऊंड रॉबिन पद्धतीने एकमेकांशी खेळतील. गट-साखळी संपल्यानंतर अव्वल -४ संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
डबल-हेडर सामने -
पहिल्या ११ फे्यांमध्ये सहा डबल-हेडर सामने असतील. हे सामने फक्त रविवारी खेळले जातील. डबल हेडरमधील पहिला सामना २९ नोव्हेंबरला जमशेदपूर एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यात टिळक मैदान स्टेडियमवर संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल.
एफसी गोवा २२ नोव्हेंबरला मडगावच्या फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर माजी चॅम्पियन बंगळुरू एफसीविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे. लीगचे उर्वरित ५५ सामने डिसेंबरमध्ये एशियन फुटबॉल कन्फेडरेशन (एएफसी) चे कॅलेंडर जाहीर झाल्यानंतर जाहीर केले जातील. पहिल्या ११ फेऱ्यांचा शेवटचा सामना ११ जानेवारी २०२१ रोजी मोहन बागान आणि मुंबई शहर एफसी यांच्यात खेळला जाईल.