रिओ दि जानेरो - फ्रान्सचा फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मेनचा (पीएसजी) स्टार खेळाडू नेमारने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ५०० जणांसोबतच्या एका पार्टीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. २८ वर्षीय नेमारने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते, ज्यात तो आपल्या कुटुंबासह आणि मित्रांसह पार्टीची तयारी करताना दिसला.
हेही वाचा - जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या वरिष्ठ संघात निवड
तर काही माध्यमांच्या वृत्तानुसार, ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो येथे नेमारने भाड्याने घेतलेल्या एका हवेलीत पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत १०० लोक उपस्थित होते. गेल्या महिन्यातच नेमारला घोट्याची दुखापत झाली आणि त्यानंतर त्याला घरी परतण्याची परवानगी देण्यात आली.
नेमार जानेवारीत फुटबॉल सामना खेळणार आहे. १३ डिसेंबर रोजी फ्रान्स फुटबॉल लीगमध्ये लिओनविरुद्ध झालेल्या सामन्यात नेमार जखमी झाला होता. ओगो मेंडिस याच्याशी झालेल्या धडकीमुळे नेमारला घोट्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला.
फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स लीगच्या अंतिम -१६ मध्ये बार्सिलोनाविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी नेमार पूर्ण तंदुरुस्त होईल, असे क्लबने म्हटले आहे. नेमार ऑगस्ट २०१७ मध्ये बार्सिलोनाला सोडून पीएसजीत दाखल झाला. त्याने पीएसजी क्लबला सलग तीन लीग-१ विजेतेपद जिंकण्यास मदत केली आहे. याखेरीज, संघाने मागील मोसमातील चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तेथे त्यांना बायर्न म्युनिककडून पराभवाला सामोरे जावे लागले.