बार्सिलोना - जुव्हेंटसच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे पछाडत यंदाच्या 'बलोन डी ओर' पुरस्कारावर मेस्सीने आपले नाव कोरले. त्यामुळे मेस्सीने सहाव्यांदा ‘बलोन डी ओर’चा (Ballon d'Or) पुरस्कार खिशात घातला. फुटबॉल चाहत्यांना निखळ आनंद देणाऱ्या मेस्सीने त्याच्या बार्सिलोना या स्पॅनिश क्लबसाठी एक महत्वाचे विधान केले आहे.
हेही वाचा - केरळमध्ये सामना खेळताना फुटबॉलपटूचा मृत्यू
ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने बार्सिलोना संघात त्याची जागा घ्यावी, अशी इच्छा मेस्सीने व्यक्त केली आहे. मेस्सी गरज भासल्यास बार्सिलोना सोडण्यास तयार आहे. बार्सिलोना संघाने नेमारला मेस्सीच्या जागी स्थान देणार असल्याचे संकेत दिल्यानंतर मेस्सीचे हे वक्तव्य समोर आले आहे.
फ्रान्स फुटबॉलच्या मते, मेस्सीने नेमारला व्हॉट्सअॅप संदेश पाठवला होता. 'तू संघात परत यावेस. आपण एकत्र चॅम्पियन्स लीग जिंकू शकतो. मी दोन वर्षात बार्सिलोना सोडणार आहे. तोपर्यंत तू एकटा पडशील. त्यामुळे तू माझी जागा घेऊ शकतो', असे या संदेशात म्हटले गेले आहे.
नुकत्याच झालेल्या मायोर्काविरुद्धच्या सामन्यात बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पेनमधील स्पर्धा ला लिगात आपल्या ३५ व्या हॅट्ट्रिकची नोंद केली. त्यामुळे या स्पर्धेत सर्वाधिक हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. या सामन्याआधी मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोघांनीही ला लिगामध्ये ३४ हॅट्ट्रिक केल्या होत्या. मात्र, मेस्सीने त्याला पछाडले आहे.