नवी दिल्ली - सलग दुसर्या वर्षी लिओनेल मेस्सी एका वर्षात सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू बनला आहे. क्रीडा मासिक फोर्ब्सने २०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉलपटूंची यादी जाहीर केली असून अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू मेस्सी १२६ मिलियन डॉलर्स (९२७ कोटींपेक्षा जास्त) कमाई करत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत मेस्सीची कमाई ७ कोटींनी कमी झाली आहे. मेस्सीने आपल्या मानधनातून ९२ मिलियन डॉलर्स (सुमारे ६७७ कोटी) तर, उर्वरित ३४ मिलियन डॉलर्स (२५० कोटी) इतर उत्पन्नाच्या साधनांकडून मिळवले आहेत.
पोर्तुगालचा कर्णधार आणि जुव्हेंटसचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो कमाईच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक चाहते असणाऱ्या रोनाल्डोने यंदा ८६१ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पॅरिस सेंट जर्मनचा फुटबॉलपटू आणि ब्राझीलचा सुपरस्टार नेमार ७०६ कोटी रुपयांच्या कमाईसह तिसर्या स्थानावर आहे.
२१ वर्षीय एम्बाप्पेने कमाईत कमालीची उडी घेतली आहे. फ्रान्सच्या या खेळाडूने साडेतीनशे कोटींची कमाई केली आहे. त्याने अंतिम पाचमध्ये प्रवेश घेत सर्वांनाच धक्का दिला. गेल्या वर्षी तो ३०० कोटींच्या कमाईसह सातव्या क्रमांकावर होता.
लिव्हरपूलच्या संघाचा महत्त्वाचा सदस्य इजिप्तचा फुटबॉलपटू मोहम्मद सालाह २७२ कोटी रुपयांसह सातव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर आला आहे. यंदाच्या कमाईत फ्रान्सचा पॉल पोग्बा सहावा, बार्सिलोनाचा अँटिनो ग्रिझमन सातवा, रियल माद्रिदचा गॅराथ बेले आठवा, बायर्न म्यूनिकचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवान्डोस्की नववा आणि मँचेस्टर युनायटेडचा डेव्हिड डी गिया दहावा फुटबॉलपटू ठरला आहे.