बार्सिलोना - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 2021 नंतर बार्सिलोनाशी करार वाढवण्याच्या विचारात नाही. माध्यमांच्या अहवालानुसार, मेस्सी करार संपल्यानंतर क्लब सोडण्याचा विचार करत आहे. त्याचा करार पुढील वर्षी संपुष्टात येईल.
क्लबकडून सर्वाधिक गोल करणारा मेस्सी क्लबबरोबर नवीन करारावर स्वाक्षरी करणार होता. हा करार त्याला 2023 पर्यंत क्लबशी जोडणार होता. पण, एका वृत्तानुसार, 33 वर्षीय मेस्सीने आपला विचार बदलला आहे आणि आता तो करार संपल्यानंतर क्लब सोडेल.
या अहवालानुसार, मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांनी क्लबशी करार वाढवण्याबाबत चर्चा सुरू केली होती, पण आता मेस्सीला बार्सिलोनामध्ये रहायचे नाही. मेस्सीने अलीकडेच आपल्या कारकिर्दीतील 700 वा गोल केला आहे. स्पॅनिश लीगमध्ये अॅटलेटिको माद्रिद यांच्याशी झालेल्या सामन्यात त्याने हे कामगिरी केली. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता.
बार्सिलोनाकडून खेळताना मेस्सीचा हा 630 वा गोल होता. मेस्सीने 1 मे 2005 रोजी बार्सिलोनासाठी पहिला गोल केला होता. 2012 मध्ये मेस्सीने 91 गोल केले होते. या गोलसह त्याने ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा वर्षातील 75 गोलचा विक्रम मोडित काढला.