कोलकाता - पुढच्या हंगामापर्यंत चाहत्यांना स्टेडियममध्ये परवानगीची शक्यता नाही, असे स्पॅनिश फुटबॉल लीग ला लीगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. यंदाच्या ला लीगाच्या पहिल्या दोन फेऱ्यांच्या सामन्यांची घोषणा झाली आहे. 11 जूनला सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सेविला आणि रिअल बेटिस आमनेसामने असतील. तर, 13 जूनला बार्सिलोनाचा संघ रियल मॅलोर्काविरुद्ध उभा ठाकेल. कोरोनामुळे ही लीग मार्चमध्ये तहकूब करण्यात आली होती.
ला लीगा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जोस अँटोनियो काचाजा यांनी पत्रकारांना सांगितले, "प्रत्येक स्टेडियममध्ये काहीतरी समान असले पाहिजे. मी आत्ता उत्तर देऊ शकत नाही. परंतु पुढच्या हंगामात सप्टेंबरपर्यंत हे होऊ शकत नाही. हे सर्व आरोग्य अधिकाऱ्यांवर अवलंबून असेल. जेव्हा प्रत्येक स्टेडियममध्ये परवानगी असेल तेव्हाच हे घडेल."
यापूर्वी ला लीगाचे अध्यक्ष जेवियर तेबास म्हणाले होते, की स्टेडियमवर चाहत्यांसह शक्य तितक्या लवकर सामन्याचे आयोजन करण्यास ते अनुकूल आहेत.
यंदाच्या ला-लीगा हंगामातील उर्वरित 11 सामन्यांमध्ये प्रेक्षकांना व्हर्च्युअल स्टेडियममध्ये बसलेले दाखवले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर सामन्यांमध्ये चाहत्यांचा आवाजही ऐकू येणार आहे. खबरदारी म्हणून सर्व सामने रिकाम्या स्टेडियमवर खेळले जातील.