पॅरिस - फ्रान्सचा स्टार आणि युवा फुटबॉलपटू किलीयन एम्बाप्पेला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे तो यूएफा नेशन्स लीगमधील क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. फ्रान्स फुटबॉल फेडरेशनने (एफएफएफ) ही माहिती दिली.
एका वृत्तसंस्थेनुसार, एम्बाप्पेला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तो सध्या राष्ट्रीय संघाबाहेर असून आपल्या घरी क्वारंटाइन आहे. शनिवारी स्वीडनविरुद्धच्या सामन्यात एम्बाप्पेने गोल करत आपल्या संघाला १-०ने विजय मिळवून दिला होता.
फ्रान्सचा फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मेनकडून (पीएसजी) खेळणारा एम्बाप्पे हा कोरोनाची लागण झालेला क्लबचा सातवा खेळाडू आहे. गेल्या आठवड्यात क्लबचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या सहा खेळाडूंसह, एम्बाप्पे हा फ्रान्स लीगच्या नवीन हंगामात पीएसजीच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.