नवी दिल्ली - इटलीचा फुटबॉल क्लब जुव्हेंटसच्या सर्व खेळाडूंची कोरोनाची चाचणी नेगेटिव्ह आली आहे. त्यामुळे क्लब आता मोठ्या गटात सराव करणार आहे. "काल इटालियन फुटबॉल महासंघाच्या (एफआयजीसी) वैद्यकीय वैज्ञानिक आयोगाकडून अर्ज आल्यानंतर संपूर्ण संघाची कोरोनाची तपासणी झाली आहे. यामध्ये सर्व खेळाडूंची चाचणी नेगेटिव्ह आली आहे. त्यानंतर आम्ही आता पुढील काही दिवसात मोठ्या गटात प्रशिक्षण करु", असे क्लबने एका निवेदनात म्हटले आहे.
जुव्हेंटसचे खेळाडू वैयक्तिक पातळीवर प्रशिक्षण घेत आहेत. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही मंगळवारी आपल्या खेळाडूंबरोबर सराव केला. सेरी-ए लीग 13 जूनपासून सुरू होणार होती. मात्र, ही लीग 15 जूनपर्यंत सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने सोमवारी सांगितले होते.
सेरी-ए लीगचा सध्याचा हंगाम 20 ऑगस्टपर्यंत संपेल आणि त्यानंतर 1 सप्टेंबर ते 2020-21 पर्यंत नवीन हंगाम सुरू होईल, असेही एफआयजीसीने म्हटले आहे.