मुंबई - इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) २०२०-२१ च्या हंगामाचे यजमानपद गोव्याला देण्यात आले आहे. आयएसएलचा सातवा हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. मडगावचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम, वास्को दि गामामधील टिळक नगर स्टेडियम आणि बंबोलममधील जीएमसी अॅथलेटिक स्टेडियम आयएसएलच्या सातव्या सत्रातील सर्व सामने आयोजित करतील.
आयएसएल आयोजक फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या (एफएसडीएल) संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या, "आयएसएलचा सातवा हंगाम गोव्यात होणार असल्याने मला आनंद झाला आहे. मागचा हंगाम आम्ही गोव्यातच केले होते. गोवा हे सुंदर राज्य आहे. भारतातील सुंदर खेळाचे केंद्र बनल्यामुळे फुटबॉलच्या चाहत्यांचे अभिनंदन.''
कोरोना काळात खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या प्रवासावरील निर्बंधामुळे आयएसएल आयोजकांना यावेळी एकाच राज्यात लीग आयोजित करण्याची इच्छा होती. केरळदेखील या यजमानपदाच्या शर्यतीत सहभागी होता. पण शेवटी गोव्याने बाजी मारली. यंदाचा हंगाम सुरक्षित करण्यासाठी एफएसडीएल आता भारतीय क्रीडा प्राधिकरण, गोवा फुटबॉल असोसिएशन आणि राज्य प्रशासन यांच्यासोबत काम करेल.
कोरोनामुळे आयएसएलच्या सातव्या सत्रातील सामने जैव सुरक्षित वातावरणात खेळवण्यात येतील. या वेळी सर्व क्लब आणि खेळाडूंना आरोग्य आणि सुरक्षिततेशी संबंधित नियम पाळावे लागतील.