नवी दिल्ली - थायलंड येथे जूनमध्ये होणाऱ्या किंग्स फुटबॉल कपसाठी ३७ संभाव्य खेळाडूंची यादी भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी जाहीर केली आहे. तब्बल ४२ वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर भारतीय संघ या किंग्स फुटबॉल कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी दिल्लीत २० मेपासून संघाचे शिबिर सुरू होणार आहे.
१९६८ पासून चालू झालेल्या किंग्स कपमध्ये भारताने शेवटचा सामना हा १९७७ साली खेळला होता. या स्पर्धेत भारतासह यजमान थायलंड, व्हिएतनाम आणि कुरसावो देशाचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने बरीराम येथील चांग एरेना फुटबॉल मैदानावर खेळले जाणार आहेत.
फिफाने (Federation Internationale de Football Association) एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताचा फुटबॉल संघ १०१व्या स्थानी आहे. तर थायलंड ११४व्या, व्हिएतनाम ९८व्या तर कुरसावोचा संघ ८२व्या स्थानी आहे.
किंग्स फुटबॉल कपसाठी ३७ संभाव्य भारतीय खेळाडू
- गोलरक्षक - गुरप्रीतसिंग संधू, विशाल कैथ, अमरिंदरसिंग आणि कमलजीतसिंग.
- बचाव फळी - प्रीतम कोताल, निशु कुमार, राहुल भेके, सलाम रंजनसिंग, संदेश झिंगन, आदिल खान, अन्वर अली, शुभाशीष बोस व नारायण दास.
- मधली फळी - उदांतासिंग, जॅकीचंदसिंग, ब्रँडन फर्नांडिस, अनिरुद्ध थापा, रेनियर फर्नांडिस, बिक्रमजीतसिंग, धनपाल गणेश, प्रणय हलधर, रोलिन बोर्गेस, जर्मनप्रीतसिंग, विनित रॉय, सहल अब्दुल, अमरजीतसिंग, रीडीम तलांग, लालरिजुआला छांगटे, नंदा कुमार, कोमल थताल, मायकेल सूसइराज.
- आक्रमक फळी - बलवंतसिंग, सुनील छेत्री, जॉबी जस्टिन, सुमीत पासी, फारूख चौधरी व मनवीरसिंग.