मस्कत - भारतीय फुटबॉल संघाचे फीफा विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. 'फिफा' विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत भारताला अद्याप एकही विजय मिळवता आला नाही. ओमानविरुध्दच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक होता. मात्र, ओमानने १-० ने पराभव करत भारताची 'फीफा २०२२' खेळण्याची आशा धुळीस मिळवली.
फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात निराशाजनक कामगिरी करणारा भारतीय संघ विजयापासून वंचित राहिला आहे. 'फिफा'च्या क्रमवारीत ८४ व्या स्थानावर असलेल्या ओमानविरुद्धच्या झालेल्या लढतीत भारताचा पराभव झाला. या पराभवाबरोबरच भारतीय संघ फीफा रेसमधून बाहेर पडला आहे. ओमानचा खेळाडू मुहसेन अल-घस्सानी याने ३३ व्या मिनिटाला गोल केला.
ई-गटात समावेश असलेला भारतीय संघ ३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंतच्या ५ सामन्यांपैकी ३ सामने बरोबरीत सोडवले आहेत, तर २ सामन्यात पराभव पत्करला आहे. भारत आणि ओमानच्या सामन्यानंतर कतारचा (१३ गुण) संघ गटात अग्रस्थानी असून ओमान (१२ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. तर अफगाणिस्तान (४ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे.
ओमानविरुध्द भारतीय संघाला विजय आवश्यक होता. या विजयाने भारतीय संघाच्या पात्रतेच्या आशा जिवंत राहणार होत्या. मात्र, त्या पराभवाबरोबर संपुष्टात आल्या आहेत.