मुंबई - लॉकडाऊनमुळे गेले 5 महिने भारतात अडकलेला घानाचा फुटबॉलर रॅन्डी जुआन म्युलर त्याच्या मायदेशी परतला आहे. मायदेशी परताच त्याने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनल यांचे आभार मानले. त्याने एका व्हिडिओद्वारे 'जय महाराष्ट्र' म्हणत महाराष्ट्राने केलेल्या मदतीचे आभार मानले.
भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द केल्यावर 74 दिवस रॅन्डी जुआन म्युलरने मुंबई विमानतळावर घालवले. विमानतळावर राहूनही खेळायची संधी मिळाल्यास भारतातच राहण्याची इच्छादेखील रॅन्डी जुआन म्युलरने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली होती. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळ खेळले जात नसल्यामुळे रॅन्डी म्युलरला 5 महिन्यानंतर आपल्या मायदेशी परतावे लागले आहे.
![footballer from ghana randy juan muller returned to his country](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-ghanafoorballer-7204426_24082020170758_2408f_1598269078_37.jpg)
74 दिवस विमानतळावर घालवल्यावर युवा सेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनल व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत म्युलरची राहण्याची सोय वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये केली होती. जवळपास अडीच महिने येथे युवासेनेच्या वतीने देखभाल करण्यात आली. तसेच त्याची परतण्यासाठीची संपूर्ण जबाबदारी देखील राहुल कनल यांनी घेतली. त्यामुळे राहुल कनल व आदित्य ठाकरे यांचे रॅन्डी जुआन म्युलरने आभार मानत पुन्हा भेटू असे म्हटले आहे.