नवी दिल्ली - फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने यंदाचा 'फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडू' हा पुरस्कार पटकावला. मेस्सीने हा पुरस्कार जिंकताना पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोला पछाडले. या पुरस्कारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप निकारागुआचा कर्णधार जुआन बारेराने केला होता. मात्र, फिफाने हा आरोप नाकारला आहे.
हेही वाचा - सचिन खेळतोय चक्क पाण्यात क्रिकेट..पाहा व्हिडिओ
सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मतदान घेण्यामध्ये चूक झाली असल्याच्या आरोपाचे फिफाने खंडण केले आहे. जुआन बारेराने या पुरस्काराविषयी चौकशी करण्याची मागणी केली होती. बारेराच्या म्हणण्यानुसार, त्याने मेस्सीला मत दिले नव्हते. त्यानंतर फिफाने या प्रकरणावर चौकशी केली.
'आम्ही निकारागुआद्वारा लिखित प्रत्येक कागदाला तपासले आहे. त्यावर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे निकारागुआ फुटबॉल महासंघाला या मुद्दयावर चौकशी करण्यास सांगितले आहे', असे फिफाने म्हटले आहे.
इटलीच्या मिलान येथे फिफा फुटबॉल पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फिफा 'बेस्ट प्लेयर ऑफ द इयर' या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीसोबत रोनाल्डो आणि नेदरलँडच्या वर्जिल वॅन डिकचाही समावेश होता. मात्र, या स्पर्धेत मेस्सीने बाजी मारत सहाव्यांदा हा पुरस्कार आपल्या खिशात घातला. तर, महिला खेळाडूंमध्ये मेघन रॅपिनो हिने पहिल्यांदा फिफा 'वुमन ऑफ द इयर' चा पुरस्कार जिंकला आहे.