नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलल्यानंतर फुटबॉल विश्वाची जागतिक संघटना फिफाने खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फिफाने टोकियो ऑलिम्पिकसाठी फुटबॉलपटूंसाठी वयोमर्यादा वाढविली आहे. आता १ जानेवारी १९९७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले फुटबॉलपटू ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकतील.
यासोबतच फिफाने कोरोना व्हायरसमुळे नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी १७ वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयासोबतच, कार्यकारी गटाने २० वर्षाखालील महिला विश्वकरंडक स्पर्धा (पनामा-कोस्टा रिका) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा यंदा ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान होणार होती.
यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या स्पर्धांच्या नवीन तारखांची घोषणा झाली असून स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑलिम्पिक स्पर्धा आता २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात होणार आहेत. तर पॅरालिम्पिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान आयोजित केल्या जातील.