गोवा - इंडियन सुपर लीगच्या सहाव्या हंगामाचे जेतेपद अॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात चेन्नईयन एफसीचा ३-१ असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यादरम्यान चेन्नईयन एफसीच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनाची दहशत.. आयपीएल फ्रेंचायझींनी आपले सराव सत्र केले रद्द, खेळाडू परतले
गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात चेन्नईयन एफसीच्या एका अधिकाऱ्याने गांजा आणला होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. 'चेन्नई संघाचे अधिकृत छायाचित्रकार आणि सोशल मीडिया हँडलर भूषण बागडिया यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २४ ग्रॅम गांजा सापडला आहे. अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली', असे फातोर्डा पोलिस स्टेशनचे प्रभारी कपिल नायक यांनी सांगितले.
झेविअर हर्नांडेझच्या सर्वोत्कृष्ट दोन गोलच्या आधारे एटीकेने दोन वेळच्या चॅम्पियन चेन्नईयन एफसीला नमवत आयएसएलच्या सहाव्या हंगामाचे जेतेपद पटकावले. यापूर्वी २०१४ आणि २०१६ मध्ये एटीकेने जेतेपद पटकावले होते.