रिओ डि जानेरो - दक्षिण अमेरिकेतील सर्वात प्राचीन मानल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ब्राझील संघाने पेरूवर मात केली. ब्राझीलने पेरूला ३-१ ने हरवत यंदाच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
माराकाना स्टेडियमवर रंगलेल्या या महामुकाबल्यात ब्राझीलच्या एवर्टन सोरारेसने १५व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर पेरूच्या पावलो गेरेरोने ४४ व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलशी बरोबरी साधली. ४८ व्या मिनिटाला ब्राझीलच्या जीससने लगेच गोल करत पेरूवर आघाडी मिळवली. याच जीससला सामन्याच्या ७० व्या मिनिटाला लाल कार्ड मिळाल्याने मैदान सोडावे लागले. त्यामुळे उरलेल्या वेळेत ब्राझीलला १० खेळाडूंसह खेळावे लागले.
सामन्याची रंगत वाढत असताना ब्राझीलने पेरूवर आक्रमण चालूच ठेवले. सामन्याच्या शेवटी ९० व्या मिनिटाला रिचार्लिसनने गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद ब्राझीलने पाच वेळा पटकावले आहे. तर, उरुग्वेने सर्वाधिक म्हणजे १५ वेळा जेतेपद पटकावले आहे. १९७५ नंतर पेरुला पहिल्यांदा जेतेपद जिंकायची संधी होती. मात्र, ब्राझीलने त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले.