नवी दिल्ली - अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) कोरोना व्हायरस विरूद्ध लढ्यात पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले आहे. एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, की देशवासियांच्या प्रेम आणि पाठबळामुळे आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली आणि आता या कठीण परिस्थितीत देशाला मदत करणे आपले कर्तव्य आहे. 25 लाख रुपयांचे योगदान देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आणि आम्ही एकमेकांच्या मदतीने या संकटातून मुक्त होऊ.
एआयएफएफने आपल्या सर्व कर्मचार्यांना १४ मार्चपासून घरातून काम करण्याचे आदेश दिले होते, तसेच पुढील निर्णय होईपर्यंत देशातील सर्व फुटबॉल स्पर्धा आणि उपक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत.
कोरोनाविरोधातील लढ्यात आतापर्यंत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, नेमबाज इशा सिंग, पी. व्ही. सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, सानिया मिर्झा, सौरभ गांगुली, हिमा दास, मिताली राज, पूनम यादव, दीप्ती शर्मा यांनी मदत केली आहे.
याव्यतिरिक्त बीसीसीआयने ५१ कोटी, मुंबई क्रिकेट संघटनेने मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाख दिले आहेत. तर हॉकी इंडियाने २५ लाख रुपयांची मदत दिली आहे.