मुंबई - उझबेकिस्तान येथे अंडर-२३ एएफसी फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात २६ मार्चला सामना होणार आहे. भारताचा माजी फुटबॉल कर्णधार भास्कर गांगुलीने यावर मत देताना म्हटले आहे, की पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्व वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयआयएफ) सामन्याबाबत निर्णय घेतला पाहिजे.
भास्कर गांगुली यांनी १९८२ साली आशिया कप स्पर्धेत भारताचे कर्णधारपद सांभाळले आहे. ते म्हणाले, सामना तटस्थ ठिकाणी होत असल्यास अशावेळी भारताने पाकिस्तानसोबत खेळले पाहिजे. हा निर्णय एआयआयएफने घेण्याची गरज आहे. सध्या, दोन्ही देशांतील वातावरण चांगले नाही. परंतु, सामना तटस्थ ठिकाणी खेळवला जात आहे. यासाठी भारताने पुढे जावून सामना खेळला पाहिजे. खेळाला राजकारणासोबत जोडणे चुकीचे आहे.
भारतीय फुटबॉल संघाचा आघाडीचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीने याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. छेत्री याबाबत कोणतेही प्रतिक्रिया देवू इच्छित नाही, असे छेत्रीच्या व्यवस्थापकाने सांगितले. तर, गोलकिपर सुब्रतो पॉल म्हणाला, दोन्ही देशांत युद्धासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे एआयआयएफ आणि सरकार जो निर्णय घेईल, आम्ही त्याचे पालन करू.