मुंबई - न्यूझीलंड संघाने क्रिकेट इतिहासात खूप चढ उतार पहिले आहेत. सलग दोन वेळा आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेची (२०१५ आणि २०१९) अंतिम फेरी गाठल्यानंतरही त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली. पण त्यांनी हा दुष्काळ बुधवारी संपला. न्यूझीलंडने भारतीय संघाचा पराभव करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेतेपद पटकावल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलर विजयानंतर म्हणाला, सामन्यादरम्यान भरपूर पाऊस झाला. पण आमच्या संघाने ज्या पद्धतीने संघर्ष करत सामन्यात वापसी केली. ते मी कधीही विसरू शकणार नाही. प्रचंड दबाव होता, यात दुमत नाही. पण आम्ही परिस्थिती नुसार खेळ केला.
न्यूझीलंडसाठी १०८ कसोटी सामने खेळणाऱ्या ३७ वर्षीय रॉस टेलरने अंतिम सामन्यात विजयी फटका लगावला. त्याने या सामन्यात नाबाद ४७ धावांची खेळी केली. संघ अडचणीत असताना त्याने केलेली ही खेळी न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात आजरामर झाली. सामना संपल्यानंतर रॉस टेलर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने, मी हा विजय आयुष्यभर लक्षात ठेवेन, असे सांगितलं. टेलरसोबत न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साउथी देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
भारताचा असा झाला पराभव -
अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २४९ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली. भारतीय संघ दुसऱ्या डावातही ढेपाळला आणि १७० धावांवर ऑलआऊट झाला. न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे माफक लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडने हे आव्हान २ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करत विजेतेपद पटकावले.
हेही वाचा - तेरे साथ तिरंगा है! Tokyo Olympics साठी भारताचं जबराट थीम सॉन्ग
हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर विराट निराश, दिले कसोटी संघात बदलाचे संकेत