हॅमिल्टन: भारतीय महिला संघाला ( Indian womens team ) ऑस्ट्रेलिया संघाकडून शनिवारी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भारताचा सेमीफायनल गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. तसेच बांगलादेश विरुद्ध मंगळवारी होणारा सामना भारताला कोणत्याही परीस्थित जिंकावा लागणार आहे. भारतीय संघाला आतापर्यंत सातत्याने चांगली कामगिी करता आलेली नाही. भारताने पाच खेळलेल्या सामन्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. यामध्ये भारताला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेत भारताच्या खात्यात फक्त चार गुण आहेत.
भारताची टीम एक युनिट म्हणून कामगिरी करू शकत नाही, ही भारताची समस्या आहे. कधी कधी फलंदाज चालतात तेव्हा गोलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता येत नाही आणि गोलंदाजांनी आशा उंचावल्या की, फलंदाज अपयशी ठरतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात फलंदाजांनी चांगला खेळ केला. पण गोलंदाजीमध्ये भारताने कचखाऊ कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने 278 धावांचे विक्रमी लक्ष्य गाठले. त्याआधी खेळलेल्या सामन्यात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 134 धावांवर गारद झाला होता.
भारताने गेल्या सामन्यात अष्टपैलू दीप्ती शर्माला ( All-rounder Deepti Sharma ) बाहेर ठेवत शफाली वर्माला संधी दिली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. फलंदाजीत जबरदस्त लय सापडलेल्या हरमनप्रीत कौरचा अद्याप ऑफस्पिनर म्हणून वापर झालेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी शफालीवरील विश्वास कायम ठेवला जातो की, यास्तिका भाटिया नंतर स्मृती मानधनासोबत डावाची सुरुवात करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय संघासाठी सकारात्मक गोष्ट म्हणजे कर्णधार मिताली राज ( Captain Mithali Raj ) धावा करत आहे. ती अगोदरच्या दोन सामन्यात धावा करु शकली नव्हती. बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या सामन्यात मंधानाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. भारत आता अशा स्थितीत आहे की, तो बांगलादेशला हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाही. असे अष्टपैलू स्नेह राणा देखील मानते.
स्नेह राणा म्हणाली, वातावरण सकारात्मक आहे. पराभवानंतर मनोबल तुटले, पण उद्याच्या सामन्यापूर्वी आमची मानसिक स्थिती चांगली आहे. आम्ही जिंकण्यासाठी खेळू, त्यानंतर रनरेट येते. चांगल्या कामगिरीच्या जोरावर बांगलादेश इथपर्यंत पोहोचला आहे. तो सतत सुधारत आहे. या विश्वचषकातील कोणताही सामना सोपा नाही. बांगलादेशने आतापर्यंत सर्व संघाला कडवे आव्हान दिले आहे. तर पाकिस्तानला पराभूत करण्यात तो यशस्वी ठरला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशला 141 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. त्याची गोलंदाजी चांगली आहे, पण फलंदाजी हा त्याच्यासाठी चिंतेचा विषय आहे. बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना म्हणाली की, गेल्या सामन्यात आम्ही केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत, याची आम्हाला काळजी घ्यावी लागेल.
दोन्ही संघ -
बांगलादेश: निगार सुलताना (कर्णधार), सलमा खातून, रुमाना अहमद, फरगाना हक, जहाँआरा आलम, शमीमा सुलताना, फहिमा खातून, रितू मोनी, मुर्शिदा खातून, नाहिदा अख्तर, शर्मीन अख्तर, लता मंडल, शोभना मोस्त्री, फरीहा तृष्णा, सुरैया आझमीन आणि सुरैया अख्तर. मेघला.
भारत: मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), राजेश्वामी आणि पोरेंद्र सिंह. यादव.
या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरुवात होईल.