केपटाऊन (द. आफ्रिका) : भारताची उपकर्णधार स्मृती मानधना अजूनही बोटाच्या दुखापतीतून सावरलेली नाही. त्यामुळे ती रविवारी महिला टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्याला मुकणार आहे. मंधाना (२६) या आठवड्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाली होती, त्यामुळे ती बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यातही खेळू शकली नाही.
दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होईल : 'स्मृती हिच्या बोटाला दुखापत झाली असून ती अजूनही बरी व्हायची आहे, त्यामुळे तिची खेळण्याची शक्यता कमी आहे', असे काळजीवाहू प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, 'तिच्या बोटाला कोणतेही फ्रॅक्चर नाही. आम्हाला अपेक्षा आहे की ती दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध होईल'. ते पुढे म्हणाले, 'आम्हाला मजबूत संघाविरुद्ध खेळायचे आहे. आम्ही या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. संघातील वातावरणही चांगले आहे'. मानधना ही संघाची मुख्य फलंदाज आहे. मानधनाने भारतासाठी आतापर्यंत एकूण 105 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये तिने 27.66 च्या सरासरीने 2545 धावा केल्या आहेत.
हरमनप्रीत खेळण्यासाठी फिट : कानिटकर पुढे म्हणाले की, 'कर्णधार हरमनप्रीत कौर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेदरम्यान झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरी झाली आहे'. ते म्हणाले, हरमन खेळण्यासाठी फिट आहे. गेल्या दोन दिवसांत तिने नेटमध्ये फलंदाजी केली आहे. भारतीय संघ 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १५ फेब्रुवारीला पोर्ट एलिझाबेथ येथे सामना होणार आहे. त्याचबरोबर भारत आणि आयर्लंड यांच्यात २० फेब्रुवारीला पोर्ट एलिझाबेथ येथेच शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २६ फेब्रुवारीला होणार आहे.
भारताने नुकताच अंडर-19 विश्वचषक जिंकला : भारतीय महिला संघाने अलीकडेच युवा सलामीवीर शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली महिला अंडर-19 विश्वचषक 2023 जिंकला आहे. शेफाली वर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने अंडर-19 विश्वचषकात तुफान फलंदाजी करत 7 सामन्यात 193.26 च्या स्ट्राईक रेटने 172 धावा केल्या आहेत. तसेच टीम इंडियाची यष्टिरक्षक रिचा घोषमध्ये सामन्याचा रंग एका क्षणात बदलण्याची ताकद आहे. रिचा घोषने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 30 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 134.27 च्या स्ट्राइकसह 427 धावा केल्या आहेत.
हेही वाचा : ICC Women T20 World Cup 2023 : केपटाऊनमध्ये रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; टीम इंडिया जिंकू शकते सामना