मुंबई : महिला आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी 30 हून अधिक कंपन्यांनी पाच कोटी रुपयांच्या बोलीचे कागदपत्रे खरेदी केली होती. या 30 कंपन्यांमध्ये पुरुषांच्या आयपीएल संघांच्या मालकीच्या 7 कंपन्याही सामील होत्या. परंतु, आज होणाऱ्या महिला आयपीएल संघांच्या लिलावात केवळ 17 कंपन्या सहभागी होणार असून 13 कंपन्यांनी या लिलावातून माघार घेतली आहे. हा लिलाव बंद दरवाजाआड होणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक आणि संघांना मिळालेल्या लिलावाच्या पर्सबद्दल माहिती समोर आली आहे.
या कंपन्या बोली लावणार : पुरुषांच्या IPL संघांपैकी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी सोमवारी संपलेल्या अंतिम मुदतीपूर्वी तांत्रिक बोली सादर केल्या. या सात आयपीएल फ्रँचायझींव्यतिरिक्त, अदानी ग्रुप, कॅप्पी ग्लोबल, हल्दीराम ग्रुप, टोरेंट फार्मा, अपोलो पाईप्स, अमृतलीला एंटरप्रायझेस, श्रीराम ग्रुप आणि स्लिंगशॉट 369 व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड देखील महिला आयपीएल संघांच्या लिलावात बोली लावणार आहेत.
या शहरांचा समावेश : BCCI ने 5 महिला फ्रँचायझींसाठी एकूण दहा शहरांचा समावेश केला आहे, ज्यात अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, दिल्ली, धर्मशाला, इंदूर, लखनौ, गुवाहाटी, मुंबई शहरांचा समावेश आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या 5 संघांसाठी कोणतीही आधारभूत किंमत निश्चित केलेली नाही. या दहापैकी कोणत्याही 5 शहरांमध्ये महिला आयपीएल संघांची नावे असतील. हा लिलाव सुमारे 10 वर्षांसाठी वैध असेल.
महिला आयपीएल : व्हायकॉम 18 ने आगामी महिला आयपीएलचे मीडिया हक्क पाच वर्षांसाठी हस्तगत केले आहेत. व्हायकॉम 18 ने हे हक्क तब्बल 951 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्यांनी लिलावात डिस्ने स्टार आणि सोनीसह इतर बोलीदारांना मागे टाकले आहे. महिला आयपीएलचे उद्घाटन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत पाच संघ सहभाग घेणार असून सर्व सामने मुंबईत होणार आहेत. जून 2022 मध्ये झालेल्या तीन दिवसांच्या लिलावात Viacom 18 ने IPL चे डिजिटल अधिकार 23,758 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तर डिस्ने हॉटस्टारने 2023 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी 23,575 कोटी रुपयांचे आयपीएलचे टीव्ही हक्क राखून ठेवले होते.
हेही वाचा : Women IPL Media Rights : महिला आयपीएलच्या मीडिया हक्कांचा लिलाव ; 'इतक्या' कोंटींना विकले गेले हक्क