दुबई - भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज रविवारी टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला. तो टी-20 फॉरमॅटमध्ये 10 हजार धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावे केला. विराट टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणारा जगातील पाचवा फलंदाज आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने 14 हजार 275 धावा केल्या आहे. यानंतर या यादीत वेस्ट इंडिजचा दुसरा खेळाडू केरॉन पोलार्डचे नाव येते. तो 11 हजार 195 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक 10 हजार 808 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर डेविड वॉर्नर चौथ्या स्थानी आहे. त्याच्या नावे 10 हजार 19 धावा आहेत. त्याने याच वर्षी आयपीएलमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.
विराट कोहलीने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर षटकार खेचत टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला. यासामन्याआधी विराटला हा विक्रम आपल्या नावे करण्यासाठी 13 धावांची गरज होती.
विराट कोहलीने 314 सामन्यात 10 हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने 41.61 च्या सरासरीने आणि 133.92 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या आहेत. विराटने दिल्ली, भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून टी-20 क्रिकेट खेळलं आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 51.08 च्या सरासरीने 7 हजार 765 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 12 हजार 169 धावा आहेत. त्याने कसोटीत 27 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 43 शतक झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराटने 90 सामन्यात 3 हजार 159 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 94 इतकी आहे.
हेही वाचा - KKR VS CSK : चुरशीच्या सामन्यात चेन्नईचा केकेआरवर विजय
हेही वाचा - MI Vs RCB : नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय