मुंबई - बीसीसीआयने बुधवारी रात्री आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. यात राहुल चहर याचा देखील समावेश आहे. त्याला अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या ऐवजी संघात स्थान मिळालं आहे.
निवडकर्त्यांचा राहुलवर विश्वास आहे. राहुलने वेस्ट इंडिजविरुद्ध सहा ऑगस्ट 2019 मध्ये टी-20 मध्ये डेब्यू केला. यानंतर त्याची निवड जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत देखील करण्यात आली होती.
राहुलने आतापर्यंत भारतासाठी फक्त 5 टी-20 सामने खेळली आहेत. ज्यात त्याने 19.57 च्या सरासरीने आणि 7.61 च्या इकोनॉमीने 7 गडी बाद केले आहेत. भलेही राहुल चहरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव कमी असेल परंतु त्याने आयपीएलमध्ये 38 सामन्यात 24.41 च्या सरासरीने 41 गडी टिपले आहेत.
राहुल चहरने टी-20 शिवाय भारतासाठी एक एकदिवसीय सामना देखील खेळला आहे. त्याने श्रीलंकाविरुद्ध याच वर्षी जुलै महिन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने या आपल्या पहिल्या सामन्यात 3 गडी बाद केले होते.
राहुल चहर सद्या अबुधाबीमध्ये मुंबई इंडियन्ससोबत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाची तयारी करत आहे. अशात राहुलची निवड टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात करण्यात आल्याची बातमी आली. भारतीय संघात निवड झाल्याने राहुल खूश आहे. त्याच्याकडे टी-20 विश्वकरंडकमध्ये चांगली कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी आहे.
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीकडे मोठी जबाबदारी, BCCI ची घोषणा
हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणाला मिळाली संधी