रायपूर : आज रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह मैदानात 'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज'चा अंतिम सामना पार पडला. 'इंडिया लेजंड्स' आणि 'श्रीलंका लेजंड्स'मध्ये हा सामना खेळला गेला. यामध्ये भारताने श्रीलंकेवर १४ धावांनी विजय मिळवला.
इंडिया लेजंड्सने केल्या १८१ धावा; युवराज-युसुफची चांगली खेळी..
नाणेफेक जिंकून श्रीलंका लेजेंड्सने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंडिया लेजंड्सची सुरुवात काही खास नव्हती झाली. इंडिया लेजंड्सने पहिल्या दहा षटकांमध्ये केवळ ७० धावांमध्ये तीन गडी गमावले होते. त्यानंतर मात्र युवराज आणि युसूफ या जोडीला चांगला सूर गवसल्याने, २० षटकांमध्ये एकूण चार गडी गमावत इंडिया लेजंड्सने १८१ धावा मिळवल्या. वीरेंद्र सेहवागने १० (२), सचिन तेंडुलकरने ३० (२३), एस बद्रीनाथने ७ धावांचे योगदान दिले. तर युवराज आणि युसूफने अनुक्रमे ६० आणि ६२ धावांची शानदार खेळी केली. श्रीलंका लेजेंड्सच्या रंगना हेराथ, सनथ जयसूर्या, महारुफ आणि के. वीरारत्ने यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
१६७ धावांमध्येच आटोपला श्रीलंका लेजंड्सचा डाव..
१८२ धावांचे लक्ष्य मिळालेल्या श्रीलंका लेजेंड्सची सुरुवात चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी सनथ जयसूर्या आणि तिलकरत्ने दिलशान यांनी ६२ धावांची भागीदारी केली. दिलशान २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला चमारा सिल्वालाही अवघ्या दोनच धावांचे योगदान देऊन तंबूत परतला. जयसूर्याने एक बाजू चांगली धरुन ठेवली होती, मात्र ४३ धावांवर असताना युसूफ पठानने त्याला बाद केले. त्यानंतर उपुल थरंगाही १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कौशल्य वीरारत्नेने तुफान फटकेबाजी करत श्रीलंकेच्या आशा पल्लवीत केल्या. अवघ्या १५ चेंडूंमध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने त्याने ३८ धावा केल्या. मात्र, मनप्रीत गोनीने त्याच्या या फटकेबाजीला आवर घालत त्याला परत पाठवले. जयासिंगे ३९ तर नुवान कुलशेखरा एका धावेवर नाबाद राहिला. २० षटकांमध्ये श्रीलंकेचा संघ केवळ १६७ धावांपर्यंत पोहोचू शकला. भारताकडून पठाण बंधूंनी प्रत्येकी दोन, तर मनप्रीत गोनीने एक बळी मिळवला.
पाच मार्चपासून या रोड सेफ्टी सीरीजचे रायपूरमध्ये आयोजन करण्यात आले होते. इतर संघांना नमवत श्रीलंका आणि भारताचा संघ फायनल्सपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, या सामन्याला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. यावेळी कोणतेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचेही दिसून आले.
हेही वाचा : SA Women vs Ind Women २nd T-२० : रोमांचक लढतीत आफ्रिकेचा विजय; मालिकेत विजयी आघाडी