नवी दिल्ली : भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला आयसीसी पुरुष T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 चा पुरस्कार जाहीर झाला आहे. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये आपल्या बॅटने धडाका लावला. 2022 मध्ये, सूर्यकुमार यादव T20 फॉरमॅटमध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. आंतरराष्ट्रीय T20 कॅलेंडर वर्षात हजाराहून अधिक धावा करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला. त्याने 187.43 च्या स्ट्राईक रेटने 1164 धावा केल्या. त्यामुळेच सूर्यकुमार यादव यांना हा मोठा सन्मान मिळाला आहे.
सूर्यकुमारने केल्या 1164 धावा : सन 2022 मध्ये, सूर्यकुमारने 31 टी-20 सामन्यांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 68 षटकार निघाले. एका वर्षात तो T20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने 2022 मध्ये दोन शतके आणि नऊ अर्धशतके झळकावली. त्याने पहिले शतक इंग्लंडमध्ये तर दुसरे शतक न्यूझीलंडमध्ये झळकावले. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियात 2022 च्या आयसीसी पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेतही त्याच्या बॅटमधून धडाकेबाज धावा झाल्या होत्या. त्याने 6 डावात तीन अर्धशतके झळकावली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट सुमारे 190 आणि सरासरी 60 होता.
सूर्यकुमारचे सध्या 908 रेटिंग गुण : या शर्यतीत सूर्यकुमार यादवने इंग्लंडच्या सॅम कॅरेन, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा पराभव केला आहे. या दोघांची आयसीसी पुरूष क्रिकेटपटू ऑफ द इयर पुरस्कारासाठीही निवड झाली होती. सूर्यकुमार यादव अजूनही टी-20 फॉरमॅटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज आहे. त्याचे सध्या 908 रेटिंग गुण आहेत. गेल्या वर्षीच तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. याशिवाय सूर्याने 2023 ची सुरुवातही चांगली केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत त्याने एक अर्धशतक आणि एक शतक झळकावले आहे.
महिला देखील आघाडीवर : महिला आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी 30 हून अधिक कंपन्यांनी पाच कोटी रुपयांच्या बोलीचे कागदपत्रे खरेदी केली होती. या 30 कंपन्यांमध्ये पुरुषांच्या आयपीएल संघांच्या मालकीच्या 7 कंपन्याही सामील होत्या. परंतु, आज होणाऱ्या महिला आयपीएल संघांच्या लिलावात केवळ 17 कंपन्या सहभागी होणार असून 13 कंपन्यांनी या लिलावातून माघार घेतली आहे. हा लिलाव बंद दरवाजाआड होणार आहे. स्पर्धेचे वेळापत्रक आणि संघांना मिळालेल्या लिलावाच्या पर्सबद्दल माहिती समोर आली आहे.