मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अध्यक्ष असलेले महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती संघाने घेतला आहे. महाराष्ट्र कुस्ती परिषदेने 15 ते 23 वयोगटाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन यावर्षी केले नाही. त्यामुळे महासंघाने महाराष्ट्र कुस्ती परिषद ( Maharashtra Wrestling Council ) बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्ष शरद पवार या कुस्ती परिषदेचे अध्यक्ष होते. मात्र, भारतीय कुस्ती संघटनेने घेतलेल्या निर्णयामुळे शरद पवार ( Sharad Pawar ) यांना हा मोठा धक्का समजला जातोय. भारतीय कुस्ती संघटनेचा पार पडलेल्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिज भूषण सिंह ( BJP MP Brij Bhushan Singh ) हे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. शरद पवार आणि ब्रिज भूषण सिंह यांचे अगदी जवळचे स्नेहसंबंध आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सचिव बाबासाहेब लांडगे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रारी होत आहे. तसेच त्यांच्या विरोधात काही खेळाडूंनी तक्रारी देखील केल्या होत्या. या तक्रारींची दखल कुस्ती महासंघाने घेऊन कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर लवकरच हंगामी समिती नेमन्यासाठी कुस्ती महासंघाकडून पाऊल उचलण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला ब्रिज भूषण सिंह यांनी विरोध केला होता. त्यानंतर खासदार ब्रिज भूषण यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर नाव चर्चेत होते. यातच शरद पवार आणि भूषण सिंह यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ब्रिज भूषण सिंह यांना शरद पवार यांनीच राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यास सांगितले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला होता. यानंतर स्वतः ब्रिजभूषण सिंह यांनी आपण भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असल्याने महाराष्ट्रात होणाऱ्या कुस्तीच्या सामन्याला उपस्थित होतो आणि शरद पवार हे महाराष्ट्रातील कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असल्याने उपस्थित असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
हेही वाचा - मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद - संजय राऊत